नवी दिल्ली : अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोणा-कोणाला निमंत्रण पाठवण्यात येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ३०० जणांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं जन्मभूमि ट्रस्टकडून सांगण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये देशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या नावांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अयोध्येमधील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार आहेत. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल बजाज, राजीव बजाज यांसारख्या १० उद्योगपतींच्या नावांचाही समावेश आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा देखील तयार करण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राम जन्मभूमिच्या दिशेकडे कूच करतील.
मिळालेल्या माहितीनुसार , भूमिपूजन कार्यक्रमात जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. यामध्ये ५० साधू-संत, ५० अधिकारी आणि ५० जण विश्व हिंदू परिषद (VHP) आणि न्यासाशी संबंधित असतील, शिवाय देशातील ५० नेत्यांचाही समावेश असेल.