Fact Check : आता भाडेकरूंनाही भरावा लागणार 18% GST?

हा सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्यानं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

Updated: Aug 13, 2022, 10:52 PM IST
Fact Check : आता भाडेकरूंनाही भरावा लागणार 18% GST? title=

मुंबई : तुम्ही जर भाडेकरू असाल तर ही बातमी आवर्जून पाहा...येत्या काळात भाडेकरूंना घरभाड्यासोबत GST भरावा लागू शकतो अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. झी 24 तासनं या मेसेजमागचं सत्य शोधून काढलंय.  (fact check viral polkhol tenants also have to pay 18 percent gst k ow what true what false)
 
नोकरी-कामाधंद्यानिमित गावाकडून आलेले अनेकजण शहरात भाड्यानं राहतात. अशा भाडेकरूंना एका व्हायरल मेसेजमुळं चांगलाच घाम फुटलाय. यापुढे भाडेकरूंनाही GSTच्या कक्षेत आणलं जाईल, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यात भाडेकरूंना यापुढे 18 टक्के GST भरावा लागेल, असं म्हंटलंय. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकलीय. व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहा.

केंद्र सरकारनं 18 जुलैपासून GSTचे नवे नियम लागू केले आहेत. तुम्ही जर कोणत्याही निवासी संकुलात भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला घरभाड्याव्यतिरिक्त 18 टक्के GST भरावा लागेल. 

हा सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न असल्यानं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा. सरसकट प्रत्येक भाडेकरूला घरभाड्यासह 18 टक्के GST देण्याचा नियम लागू करण्यात आलेला नाही.

कुणीही आपलं घर नोकरदार व्यक्तीला वैयक्तिक वापरासाठी भाडेतत्वावर दिलं असेल तर त्यावर जीएसटी लागू होणार नाही. मात्र GST नोंदणीकृत संस्था किंवा एखादी व्यक्ती भाड्यानं घेतलेल्या घरातून व्यापार किंवा व्यवसाय चालवत असेल तर मालकाला दिलेल्या भाड्यावर त्यांना 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.

याचाच अर्थ भाडेतत्वावर राहणा-या सामान्य जनतेला कुठलाही जीएसटी द्यावा लागणार नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज असत्य ठरलाय. अशा कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.