Fact Check | इलेक्ट्रिक स्कूटर बंद होणार?

Fact Check | दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर आता सरसकट बंदच होणार आहे. वारंवार ई स्कूटरला आगी लागत असल्याच्या घटना समोर आल्याने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंग थांबवण्याचे निर्देश केंद्र सरकारने वाहन कंपन्यांना दिले आहेत. 

Updated: Apr 29, 2022, 07:01 PM IST
Fact Check | इलेक्ट्रिक स्कूटर बंद होणार? title=

मुंबई :  बातमी आहे एका व्हायरल मेसेजची. तुम्ही ई स्कूटर खरेदी करत असाल तर थोडं थांबा. ई स्कूटर आता बंद होणार आहे असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय. पण, खरंच ई स्कूटर बंद होणार आहेत का? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check central government banned to e scooter know what true what false) 

दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर आता सरसकट बंदच होणार आहे. वारंवार ई स्कूटरला आगी लागत असल्याच्या घटना समोर आल्याने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंग थांबवण्याचे निर्देश केंद्र सरकारने वाहन कंपन्यांना दिले आहेत. तांत्रिक कमतरता असल्याचाही दावा करण्यात आल्याने ईलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांमध्ये घोर निराशा झाली आहे. 

आधीच पेट्रोल, डिझेल दरवाढीनं कंबरडं मोडलंय. त्यात ई स्कूटर ही दिलासा देणारी होती. पण, आता इलेक्ट्रिक बाईकही बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने पुन्हा पेट्रोलसाठीचा खर्च वाढणार अशी चर्चा होऊ लागली आहे. पण, खरंच असं होणार आहे का. ? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा?

सरकारने इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना आगीच्या घटनांची चौकशी होईपर्यंत नवीन वाहनांची लॉन्चिंग थांबवण्याचे निर्देश दिलेत. हा मेसेज वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. 

ज्यांनी ई स्कूटर खरेदी केलीय त्यांच्या मनात सुरक्षेविषयीची भीती निर्माण झाली आहे. तर नवीन ई स्कूटर घेण्याचा ज्यांनी प्लान केलाय ते निराश झाले आहेत. पण, हा निर्णय खरंच सरकारने घेतलाय का? याची आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात.

काय खरं काय खोटं?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना नवीन दुचाकींचं लॉन्चिंग थांबवण्यास सांगितलेलं नाही. व्हायरल होणारा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारनं असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

त्यामुळे आमच्या पडताळणीत नवीन ई स्कूटरच्या लॉन्चिंगवर सरकारने स्थगिती आणल्याचा दावा असत्य ठरला. असा कोणताही निर्णय सध्यातरी सरकारने घेतलेला नसून, आगी लागत असल्याने फक्त ओलाच्या पहिल्या बॅचच्या ई स्कूटर परत मागवल्याची माहिती आहे.