ममतांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.... - सुषमा स्वराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल...

Updated: May 8, 2019, 07:41 AM IST
ममतांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.... - सुषमा स्वराज  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात सध्याच्या घडीला राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामध्येच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल ममतांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हणत स्वराज यांनी त्यांना निशाण्यावर धरलं. 

'ममताजी तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पुढे जाऊनही तुम्हाला त्यांच्याशीच चर्चा करायची आहे', असं सूचक विधान स्वराज यांनी ट्विटमध्ये लिहित एक शेर समर्पित केला. 

'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, 
 जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.'

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगामधील अनेक भागांमध्ये भाषण करतेवेळी बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर बोचऱ्या शब्दांत टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. पुरूलिया येथेही त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. 'मला पगार किंवा निवृत्ती वेतन मिळत नाही. मी पुस्तकं लिहिते आणि त्यांचा खपही उत्तम होतो. मी काढलेल्या चित्रांसाठीही पैसे आकारत नाही. पक्ष चालवण्याची ही माझी पद्धत आहे. त्यामुळे जेव्हा प. बंगाल दौऱ्यावर आलेल्या मोदींनी चुकीच्या मार्गाने पक्षासाठी पैशांचा वापर केल्याचं वक्तव्य केलं त्यावेळी त्यांना लोकशाहीची सणसणीत चपरात द्यावीशी वाटली होती', असं थेट शब्दांत बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला होता. 

बॅनर्जी यांची गेल्या काही दिवसांपासून मोदींप्रती केली जाणारी वक्तव्य पाहता अखेर खुद्द सुषमा स्वराज यांनीच त्यांना खडे बोल सुनावले. राजकीय पटलावर बॅनर्जींची ही एकंदर भूमिका आणि त्यावर भाजपकडून येणाऱ्या प्रतिक्रिया याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे.