बँक खात्यात झिरो बॅलेन्स असूनही काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे ही सुविधा?

कसं काम करतं ओव्हरड्राफ्ट...

Updated: Aug 24, 2020, 11:39 AM IST
बँक खात्यात झिरो बॅलेन्स असूनही काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे ही सुविधा? title=
संग्रहित फोटो

मुंबई : प्रत्येकाला पैशांची अचानक, कधीही गरज भासू शकते. पण अशावेळी बँक अकाऊंटमध्ये पैसेच नसतील, अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स असेल तर? अशावेळी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट (Overdraft)ही सुविधा घेता येऊ शकते. अकाऊंटमध्ये पैसे नसल्यास, झिरो बॅलेन्स असला, तरीही बँकेतून या सुविधेद्वारे पैसे काढता येऊ शकतात. ओव्हरड्राफ्टची सुविधा जवळपास सर्वच बँकांमध्ये असते. परंतु या सुविधेसाठी व्याज द्यावं लागतं.

कसा कराल अर्ज -

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी बँकेत जाऊन किंवा ऑनलाईनरित्या अर्ज करावा लागतो. बँका या सुविधेसाठी एक टक्का प्रोसेसिंग फी घेतात. काही बँका ग्राहकांना ही सुविधा आधीपासूनच देतात, तर काही बँकांमध्ये यासाठी अर्ज करावा लागतो.

किती प्रकारचे आहेत ओव्हरड्राफ्ट -

ग्राहकांच्या गरजेनुसार, ओव्हरड्राफ्ट दिला जातो. हे एक प्रकारचं कर्जच असतं. ज्यावर बँक व्याजही वसूल करते. ओव्हरड्राफ्ट गॅरेंटी आणि विना गॅरेंटी अशा दोन्ही परिस्थितीमध्ये मिळू शकतं. 

- सॅलरी ओव्हरड्राफ्ट 

ग्राहक आपल्या सॅलरी अकाऊंटवर ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतात. साधारणपणे सॅलरीच्या 2 ते 3 पटीने ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. उदा. सॅलरी 50 हजार रुपये महिना असेल तर 1.5 लाख रुपये ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. ज्या बँकेत सॅलरी अकाऊंट आहे त्याच बँकेतून ओव्हरड्राफ्टची सुविधा घेता येते. याला शॉर्ट टर्म लोनही म्हणतात.

घरासाठी ओव्हरड्राफ्ट -

बँका, होम लोन ग्राहकांनाही ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात. मालमत्तेच्या एकूण किंमतीच्या 50 ते 60 टक्के ओव्हरड्राफ्टची किंमती असू शकते. ओव्हरड्राफ्ट करण्यापूर्वी बँकेकडून, ग्राहकाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि क्रेडिट स्कोअरचं मूल्यांकनही केलं जातं.

इन्शोरन्स पॉलिसीवर -

ग्राहक विमा पॉलिसी सिक्योरिटी म्हणून ठेऊनही ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतात. ओव्हरड्राफ्टची रक्कम विम्याच्या किंमतीवर आधारित असते.

एफडीवर FD ओव्हरड्राफ्ट -

ग्राहकांना FDच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. यावर बँक ग्राहकांकडून कमी व्याज घेते. 

ओव्हरड्राफ्ट कसं काम करतं -

जर बँक आधीपासूनच ओव्हरड्राफ्टची सुविधा देत असेल, तर ग्राहक गरज असेल तेव्हा ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे काढू शकतात. ते आपोआप ओव्हरड्राफ्टमध्ये जातात. ओव्हरड्राफ्टची रक्कम ग्राहकांवर अवलंबून असते. त्यानंतर क्रेडिट कार्डच्या बिलाप्रमाणे हे पैसे बँकेला भरावे लागतात. जोपर्यंत पूर्ण रक्कम बँकेला पुन्हा परत करत नाही, तोपर्यंत बँक व्याज वसूल करते. या घेतलेल्या कर्जावरील किंवा थकबाकीवरील व्याज दररोज आकारलं जातं. जसजसं खात्यात पैसे भरले जातात तशी थकबाकी कमी होते. त्यामुळे यावर दररोज व्याज आकारलं जाते.