कोणत्याही आजारावरील लस घेतली, म्हणजे आपल्याला त्या आजारापासून कायमचं संरक्षण मिळालं, असं मानलं जातं. मात्र कोरोना लसीच्या बाबतीत अजबच प्रकार घडला आहे. कारण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतरही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली आहे.
हा चक्रावणारा प्रकार घडला आहे मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये. जबलपूरच्या गांधी सरकारी मेडिकल कॉलेजच्या वरिष्ठ महिला डॉक्टराला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. मात्र तरीही त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर आपल्याला आता मास्कची गरज नाही, असा त्या महिला डॉक्टरचा समज होता, अशी माहिती डॉक्टरच्या ओळखीच्यांनी दिली आहे. कदाचित हाच निष्काळजीपणा त्यांना भोवला असल्याचं मानलं जाते आहे.
१६ जानेवारीला देशभरात जेव्हा लसीकरणाची मोहीम सुरू झाली, तेव्हाच या ४८ वर्षीय डॉक्टरला डोस देण्यात आलेला. दुसरा डोस त्यांनी १ मार्चला घेतला. मात्र १० मार्चला केलेल्या चाचणीत त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांना आता १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, तसाच मध्य प्रदेशातही वाढू लागला आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे एकूण रुग्णांची संख्या कमी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ६७ हजार ८५१वर आहे.