नवी दिल्ली : नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. २०० आणि २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलल्या जाणार नाहीयेत असं रिझर्व्ह बँक इंडियाने म्हटलं होतं. मात्र, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये कारण, याच नोटा तुम्हाला मालामाल बनवणार आहेत. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
२०० आणि २००० रुपयांच्या नोटांची चुकीची प्रिंटींग झाली असेल तर या नोटांच्या बदल्यात तुम्हाला अनेक पटींनी किंमत मिळू शकते. अशा नोटांची बाजारात मोठी किंमत आहे. प्रिटींग करत असताना चुकून राहणारे नंबर, सीरिज किंवा एखादं चिन्ह छापणं राहीलं असेल तर अशी नोट तुम्हाला मालामाल बनवू शकते. यासोबतच तुमच्याकडे एखादी अँटिक करन्सी आहे तर त्याचीही तुम्हाला मोठी किंमत मिळू शकते.
इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल न्यूमिस्मॅटिक एग्झिबिशनमध्ये देश आणि परदेशातील नव्या तसेच जुन्या मुद्रांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं आहे. ऑल इंडिया फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटी तर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये करन्सी एरर (चुकीची छपाई) असलेल्या नोट आणि शिक्क्यांना चांगली किंमत मिळत आहे. १०० रुपयांच्या एका नोटवर नंबर नाहीये त्याला तब्बल १० हजार रुपये किंमत मिळत आहे. तसेच काही नाण्यांवर दोन्ही बाजूला हेड चुकून छापण्यात आलं आहे त्याची किंमत ३ ते ५ हजार रुपयांच्या घरात आहे.
न्यूमिस्मैटिक सोसायटीच्या मते, किंमत नोटांवर ठरवण्यात येते. जितकी दुर्मिळ नोट असेल तितकीच मोठी किंमत मिळते. नोटा प्रिंट होत असताना लाखो नोटांमध्ये एखादी चूक होते. सरकार या चुकीच्या बदल्यात दुसरी नोट छापत नाही. काही चुका अशाही असतात ज्या पुन्हा होत नाहीत. यामुळे जितकी दुर्मिळ चूक असेल त्या नोटला तितकीच मोठी किंमत मिळते.
भारतात दुसऱ्या महायुद्धा दरम्यान म्हणजेच १९३९ मध्ये १ रुपयांचे सिल्वर कॉईन्सची छपाई बंद करण्यात आली होती. त्यावेळचं नाणं खूपच कमी लोकांकडे आहे. याची किंमत २ ते ५ लाख रुपये आहे. दरम्यान, नकली नाण्यांचं बाजारही मोठं आहे. त्यामुळे या प्रदर्शनात नोटा आणि नाण्यांची व्यवस्थितपणे तपासणी करण्यात येते आणि त्यानंतर त्याला किंमत मिळते.