मुंबई : EPF New Rules: तुम्ही नोकरी करीत असाल आणि तुमच्या पीएफ खात्यावर दरमहिन्याला रक्कम जमा होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारने पीएफसंबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत पीएफ योगदानावर किंवा त्यातून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नव्हता. पण आता 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदानावर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल. हा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021 च्या अर्थसंकल्पात या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ईपीएफमधील कर्मचाऱ्याच्या वर्षभरात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल, असे म्हटले होते. हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
या निर्णयाचा परिणाम अशा लोकांवर होईल ज्यांचे उत्पन्न जास्त आहे. आणि ज्यांचे ईपीएफमध्ये अधिक योगदान आहे. परंतु, ईपीएफमध्ये योगदान देणाऱ्या 1 टक्क्यांहून कमी लोकांवर याचा परिणाम होईल, असे सरकारने म्हटले आहे.
वित्त कायदा 2021 मध्ये एक नवीन तरतूद जोडण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने आर्थिक वर्षात त्याच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीवर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जर एखाद्याने 3 लाख रुपये गुंतवले, तर अतिरिक्त 50000 रुपयांवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल.
तसेच, भविष्य निर्वाह निधीमध्ये कंपनीचे कोणतेही योगदान नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, मर्यादा 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये होईल. त्याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही ही मर्यादा 5 लाख रुपये असेल.