EPS Pensioners: नोकरीवर रुजू असणाऱ्या वर्गासाठी पगारासमवेत महत्त्वाची असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, निवृत्तीवेतन. याच निवृत्तीवेतन अर्थात पेन्शनसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. ज्याअंतर्गत देशातील लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
जानेवारी 2025 पासून देशभरात पेन्शनसंदर्भातील हा नवा बदल लागू होणार असून, त्यानुसार निवृत्तीवेतनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढता येऊ शकतात. केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya ) यांनी यासंदर्भातील माहिती देत एकदोन नव्हे, तब्बल 78 लाख ईपीएस पेन्शनधारक याचे लाभार्थी ठरणार असल्याचं स्पष्ट केलं.
केंद्रीय रोजगार मंत्रालयाच्या वतीनं एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली. केंद्रीकृत पेनशन अदायगी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचं यावेळी प्रसिद्ध झालं असून, यामुळं आता सेवानिृत्त कर्मचाऱ्यांना देशात कुठूनही त्यांच्या पेन्शनची रक्कम मिळवता येणार आहे.
केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळं येत्या काळात ईपीएफओच्या आधुनिकीकरणासाठी हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे. याशिवाय सेवानिवृत्त व्यक्तीला ठराविक बँकेत जाऊनच पेन्शन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी यामुळं कमी होणार आहेत. सेंट्रलाइज्ड पेंशन पेमेंट सिस्टमच्या मदतीनं देशभरात पेन्शन डिस्बर्समेंटमध्ये मदत मिळणार असून, यामुळं पेन्शन पेमेंच ऑर्डर ट्रान्सफर करण्याची आवश्यकता भासणार नाही.
सदर बदलापूर्वी पेन्शनधारकांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी किंवा बँक शाखा बदलल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावी लागत होती. पण, आता मात्र सेवेनंतर मूळ गावी परतणाऱ्यांना मात्र यापैकी कोणत्याही क्लिष्ट प्रक्रियेचा सामना करावा लागणार नसून जानेवारी 2025 पासून त्यांचं पेन्शन खातं सेंट्रलाइज्ड पेंशन पेमेंट सिस्टमशी जोडलं जाणार आहे. जिथं त्यांच्या खात्यात सहजपणे ही पेन्शन जमा होईल.