गुणा : लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपने एकट्यानेच ३०० जागांचा आकडा गाठला आहे. तर भाजप प्रणित एनडीए ३५० जागांच्या जवळ आहे. काँग्रेसची अवस्था मात्र या निवडणुकीत अत्यंत दयनीय झाली. देशभरात काँग्रेसला फक्त ५० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेस प्रणित यूपीए ८९ जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशच्या गुणा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या कृष्णपाल सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा 1,23,626 मतांनी पराभव केला आहे. गुणा हा ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, पण याच बालेकिल्ल्यात त्यांना भाजपने पराभवाची धूळ चारली.
याआधी मागच्या ३ लोकसभा निवडणुकीत गुणा मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा विजय झाला होता. २०१४ सालच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपच्या जयभन सिंग पवायिया यांचा १.५ लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशमधला पारंपारिक मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणींनी पराभव केला. पण केरळच्या वायनाडमधून मात्र राहुल गांधी विजयी झाले. महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभव पत्करावा लागला.