बंगळुरू: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून पैशांच्या देवाणघेवाणीवर कडक नजर ठेवली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून ठिकठिकाणी छापे टाकून रोकड जप्त केल्याचे प्रकारही घडले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरचीही मंगळवारी अचानक झाडाझडती घेण्यात आली. बी.एस. येडियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर हवेच झेपावणारच होते. तेव्हा या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरमधील प्रत्येक सामानाची कसून तपासणी केली. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक काळ्या रंगाची पेटी उतरवण्यात आली होती. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
#WATCH Election Commission flying squad checks luggage of former Karnataka Chief Minister and BJP leader BS Yeddyurappa at helipad in Shivamogga, Karnataka pic.twitter.com/uZAdRCA5sO
— ANI (@ANI) April 16, 2019
दरम्यान, पैशांच्या देवाणघेवाणीबरोबरच निवडणूक आयोग राजकीय नेत्यांच्या भाषणांवरही लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रचारात धार्मिक आणि जातीय आधारावर मतदारांना प्रभावित केल्यावरून निवडणूक आयोगाने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपचे आझम खान यांच्यावर तीन दिवसांची तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि भाजपच्या मेनका गांधी यांच्यावर दोन दिवसांची प्रचारबंदी घातली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अखेरच्या महत्त्वाच्या दिवशी या नेत्यांना प्रचार करता येणार नाही.
काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या गाड्यांचा ताफाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवला होता. तत्पूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सल्लागार आणि स्वीय सहाय्य्कांसोबतच नातेवाईकांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.