इम्रान खान खरंच 'उदार' असतील तर त्यांनी मसूदला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज

'भारताचे पाकिस्तानशीही संबंध सामान्य होऊ शकतात, पण अट एकच...'

Updated: Mar 14, 2019, 09:31 AM IST
इम्रान खान खरंच 'उदार' असतील तर त्यांनी मसूदला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार असतील तर त्यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला भारताकडे सोपवावं, असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांवर, दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत चर्चा करणं शक्य नसल्याचंही त्यांनी खडसावून सांगितलंय. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या. नवी दिल्लीत 'भारतीय जग, मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारतानं केवळ जैश-ए-मोहम्मदला लक्ष्य केलं मात्र पाकिस्तान जैश-ए-मोहम्मदकडून पाकिस्तान लष्करानं का हल्ला केला? असा सवाल हवाई हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी केला. तुम्ही जैशला केवळ तुमची जमीनच वापरू देत नाही तर त्यांना पैसाही पुरवता आणि पीडित देश ज्यावेळी त्याला उत्तर देतो त्यावेळी तुम्ही त्यांच्यावतीनं त्यांच्यावर हल्लादेखील करता, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावलं. 

भारताचे पाकिस्तानशीही संबंध सामान्य होऊ शकतात, परंतु अट हीच आहे की आपल्या देशातील दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करा आणि भारताविरोधात आपल्या जमिनीवरून दहशवतवादी कारवाया बंद करा तेव्हाच सामान्य संबंधांची सुरूवात होऊ शकेल अन्यता नाही, असंही सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलंय.