कोलकाता : नवरात्रोत्सवात दुर्गा देवीच्या नवनवीन मूर्ती येत असतात. काही प्रभावी विषय या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मूर्तीकार करत असतात. कोव्हिडमुळे या वर्षी हे फारच मर्यादीत प्रमाणात होताना दिसत आहे
पश्चिम बंगालमध्येच नाही देशभरात ही दुर्गा मूर्ती चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णानगरमधील मूर्तीकार पल्लब भौमिक यांनी ही मूर्ती साकारली आहे. ही कल्पना मांडली होती रिंटू दास यांनी. महिला श्रमिकांना ही मूर्ती समर्पित केली आहे.
कोलकाता शहरात लोकप्रिया दुर्गापुजांपैकी बेहालाची बारिशा क्लब दुर्गा पूजा आहे. यात दुर्गामातेला एका महिला प्रवासी श्रमिकाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. तिच सरस्वती, लक्ष्मी, कार्तिक आणि गणेश. या मूर्तीच्या कडेवरील लहान मुल आणि या तान्ह्यामुलाला कडेवरुन घेऊन जात रस्ता कापणारी श्रमिक महिला पाहून सर्वच भावूक होतात.
Pallab Bhowmick's Ma Durga for the Pujo this year, as a migrant worker with her children.
Very evocative. pic.twitter.com/aAlJVI9XKO— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) October 16, 2020
मूर्तीकार भौमिक यांची ही मूर्ती पाहून बॉलीवूडच्या काही बड्या हस्तींनी वाहवा केली आहे. या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री उर्मिता मातोंडकरने ट्ववीट केलं आहे, 'बंगालचे कलाकार पल्लब भौमिक यांनी माता दुर्गेचं सर्वात तेजस्वी चित्रण केलं आहे. माता दुर्गा आपल्या मुलांसह प्रवासी श्रमिक महिलेच्या रुपात'
टिस्का चोपडा यांनी पोस्ट केली आहे, 'देवी दुर्गा आपल्या मुलांसोबत एक प्रवासी मातेच्या रूपात येथे पोहोचली'
दुसरीकडे मूर्तीकार भौमिक चकीत झाले आहेत, कारण त्यांना माहित नव्हतं की, आपली कलाकृती एवढी लोकप्रिय होईल. भौमिक म्हणतात, 'मी सोशल मीडियावर एवढा सक्रीय नसतो, मला हेच माहित नाही की, बॉलीवूडच्या ताऱ्यांना माझी कलाकृती एवढी आवडली, तुम्ही सांगितलं मला, खूप आनंद झाला, धन्यवाद'.
भौमिक पुढे म्हणतात, 'ही मूर्ती बनवण्यासाठी मला २ महिने लागले, ही मूर्ती फायबर ग्लासने बनवण्यात आली आहे. रिंटू दासने ही थीम तयार केली आहे, त्यांच्या सांगण्यानुसार मी मूर्ती बनवली'.
कॉन्सेप्ट डिझायनर रिंटू दास म्हणतात, 'लोक घरात बंद होते, मी टीव्ही ऑन केला तेव्हा मला हे सूचलं होतं. प्रवासी श्रमिकांचे खूपच वाईट हाल होते. ते काहीही न खाता पिता, उन्हातान्हात लहान आणि तान्ह्यामुलांसह मजल दर मजल करत घरी पोहोचत आहेत, हे क्लेशदायक चित्र होतं.'
रिंटू दास म्हणतात, 'देवी दुर्गा केवळ मूर्तीत नाही, तर प्रत्येक महिलेत असते, म्हणून ही मूर्ती या माध्यमातून आम्ही नारीशक्तीला समर्पित करीत आहोत.'