पंतप्रधान मोदींवर व्यक्तीगत टीका नको; राहुल गांधी

कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीका करू नये, असे स्पष्ट आदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 6, 2017, 08:06 PM IST
पंतप्रधान मोदींवर व्यक्तीगत टीका नको; राहुल गांधी title=

नवी दिल्ली : कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीका करू नये, असे स्पष्ट आदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.

पराभवाच्या गर्तेत सापडलेली कॉंग्रेस विजयाचा किनारा शोधत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला हा किनारा सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्साहीत असलेल्या कॉंग्रेसने भाजपवर जोरदार प्रहार करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच गुजरात म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे होमपीच. त्यामुळे भजपवर टीका करताना कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते जर या दुकलीवर बोलले नाहीत तरच नवल. दुसरे असे की, गुजरातमध्ये सलग २ दशकांहून अधिकचा काळ कॉंग्रेस गुजरातमध्ये सत्तेबाहेर आहे. या सर्वाचा परिपाक म्हणून कॉंग्रेस सध्या जोरदार आक्रमक आहे. कॉंग्रेस नेते मोदी आणि अमित शहांवर तुटून पडले आहेत.

दरम्यान, भाजपनेही या आधीच्या सर्व निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा तीव्र शब्दात समाचार घेतला आहे. त्यात कॉंग्रेसचे शिर्षस्थ नेतृत्व असलेल्या असलेल्या गांधी कुटुंबाला व्यक्तिगत लक्ष्यही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत या सर्व टीकेचे उट्टे काढायचा प्रयत्न कॉंग्रेस कार्यकर्ते करत आहेत. मात्र, स्वत: राहुल गांधींनी यावर आक्षेप घेतला असून, कोणत्याही स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करू नये, असे आदेश पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.

गुजरातमधील स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की, आपण केवळ मोदींना व्यक्तीगत लक्ष्य करून प्रचार करणार नाही आहोत. तर, गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस सकारात्मक मुद्द्यावरही प्रचार करणार आहे. गुजरातमधील प्रचारमोहीम ही 'आपली इच्छा आमचा संकल्प' या विचारावर आधारलेला असेल. तसेच, कॉंग्रेसचे सरकार आल्यावर आपण कोणत्या मुद्द्यांवर भर देणार आहोत यावरही प्रचारादरम्यान भर देण्यात यावा, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.