जर तुम्ही ऑनलाईन बिल भरत असाल तर याकडे लक्ष द्या, अन्यथा बँकेतून पैसे गायब

ऑनलाईन वीज बिल भरताना काळजी घ्या अन्यथा बसू शकतो फटका. कसा तो जाणून घ्या.

Updated: Oct 25, 2022, 04:45 PM IST
जर तुम्ही ऑनलाईन बिल भरत असाल तर याकडे लक्ष द्या, अन्यथा बँकेतून पैसे गायब title=

Light Bill online payment : आज अनेक जण वीज बिल ऑनलाईन  (Online Electricity Bill) भरत आहेत. पण ऑनलाइन बिल भरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा आणखी एक प्रकार शोधून काढला आहे. अनेक वीज कंपन्या वीज ग्राहकांना बिल जनरेट झाल्यानंतर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे रक्कम आणि पेमेंटची तारीख कळवतात. पण आता याचाच फायदा घेऊन वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्याचं काम सुरु आहे. ते ग्राहकांना अशाच प्रकारचे संदेश पाठवून लोकांना गंडा घालत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) लोकांना अशा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ट्विटरवर अनेकांनी असे मेसेज येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यावर बँकेने ग्राहकांना अशा कोणत्याही मेसेज किंवा कॉलला उत्तर न देण्याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. वीज कंपनी सहसा अधिकृत क्रमांकावरूनच एसएमएस पाठवतात. म्हणूनच त्याची नेहमी तपासणी केली पाहिजे.

तुमचे वीज बिल (Light Bill) थकले आहे. ते अपडेट करण्यासाठी, दिलेल्या नंबरवर त्वरित कॉल करा. असे न केल्यास तुमचे वीज कनेक्शन खंडित केले जाईल. असा मेसेज तुम्हाला पाठवला जाऊ शकतो. पण अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यास किंवा फोनवर माहिती दिल्यास तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.

जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर सर्वप्रथम तो मेसेज व्हेरिफाईड आयडी किंवा कोणत्याही मोबाईल नंबरवरून पाठवला गेला आहे हे तपासून घ्या. जर तो मेसेज एखाद्या नंबरवरून पाठवला असेल तर तो फेक आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा मेसेजमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कधीही संपर्क करू नका. तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करू नका. अन्यथा, यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे.