सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 10, 2023, 03:35 PM IST
सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क title=
Diwali bonus is still awaited in 43 percent private companies employees upset with this stand

Diwali Bonus :  एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही. 

तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून डीएमध्ये वाढही घोषित करण्यात आली आहे, तर काही सरकारी विभागांना बहुविध भत्ते आणि बोनसची रक्कमही देण्यात आली आहे. असं असतानाच खासगी संस्थांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळतेय. 

कर्मचाऱ्यांच्या आशा टिकून... 

दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना मिठाईचे पुडे, गिफ्ट कार्ड किंवा एखादं गॅजेट आणि फार फार तर दिवाळी भेट देत दुधाची तहान ताकावर भागवली आहे. थोडक्यात पगाराच्या रकमेत बोनस दिलेला नसून त्यासंदर्भातील तशी कोणतीच घोषणाही केलेली नाही. एका अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार खासगी क्षेत्रातून तब्बल 43 टक्के कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिलेला नाही. पण, कर्मचाऱी मात्र अद्यापही कंपनीकडून फार आशा बाळगून आहेत. बोनस न मिळालेल्या या कंपन्यामध्ये बीपीओ, आयटी आणि आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. 

कंपन्यांचं मौन कायम... 

सर्वेक्षणामध्ये साधारण 2100 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यातून 66 टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून कॅश बोनस, गिफ्टची घोषणा करावी अशी मागणी केली. अनेक कंपन्यांनी अद्यापही कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा केलेली नाही. तर, काही कंपन्यांकडून बोनस प्रक्रियेमध्येसुद्धा ठराविक मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच बोनस दिल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार

एकिकडे काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाची पोचपावती म्हणून कार, बाईक, ट्रॅव्हल पॅकेज अशा स्वरुपात दिवाळी भेट आणि बोनस दिला जात असतानाच दुसरीकडे मात्र काही कर्मचारी या हक्काच्या बोनसपासूनही वंचित आहेत हेच दाहक वास्तव.