उरण: आपल्यावर कोणतीही 'ईडी-पिडा' येऊ नये, यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासमोर मुजरा केल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. ते मंगळवारी उरणच्या कोप्रोली नाका परिसरातील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आमदार, खासदार किंवा मंत्री नाहीत. मग त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? याची चौकशी झाली असती तर खरी माहिती बाहेर आली असती. त्यामुळेच ईडीची पिडा टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाला मुजरा केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रचारासाठी जाऊन 'जय गुजरात' बोलून आले, अशी टीका धनंजय यांनी केली.
यावेळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाचाळवीरपणा वाढत आहे. हाफ चड्डीची फुल पँट झाली म्हणजे माणसाला अक्कल येतेच असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहावे. अन्यथा निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांना मला विचारावसं वाटतंय की तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही. मग तुमच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? अहो, इडीची पिडा टळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मानाचा मुजरा करायला गुजरातला गेलात. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आलात. pic.twitter.com/Sacd0eyPXf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 23, 2019
पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. मावळ लोकसभा मतदारसंघातून युतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.