शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पण... देवेंद्र फडणवीस यांचा पवारांना टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीबाबतच्या विधानावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती

Updated: Oct 13, 2021, 05:58 PM IST
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पण... देवेंद्र फडणवीस यांचा पवारांना टोला title=

गोवा : नवी मुंबईत एका कार्यक्रमात बोलतान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं' असं विधान केलं होतं. या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीस यांच्या वक्तव्यावर टोला लगावला होता. आता याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 

पवार चार वेळा मुख्यमंत्री होते पण...

मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो, आणि चाळीस वर्षांनंतर सलग पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, पवार साहेब मोठे नेते आहेत, ते चारवेळा मुख्यमंत्री होते, पण सलग पाच वर्ष पूर्ण करु शकले नाहीत, राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलच काम केलं असतं, पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे कधी दीड वर्ष, कधी दोन वर्ष त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता आलं असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.     

पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी विरोधी पक्ष नेता म्हणूनही समाधानी आहे, हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालेली आहे. हीच माझ्या कामाची पावती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं होतं

 मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात रहात नाही. त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला होता. पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं,  असा टोलाही शरद पवार यांनी लगावला होता.