नवी दिल्ली : बाबा राम रहीम याला बलात्कार प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बाबा राम रहीमसंदर्भात अनेक खुलासे होत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, राम रहीम याच्या बाबतीत न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी हिंसाचार घडविण्याचा कट रचला होता.
बाबा राम रहीम याच्यावर सुरु असलेल्या खटल्याच्या दिवशी म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी पंचकूलामध्ये हिंसाचार घडविण्याचा कट रचला गेला होता. इतकेच नाही तर हिंसा घडविण्यासाठी आणि गर्दी जमविण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
ही रक्कम डेरा सच्चा सौदातर्फे पंचकूलातील कामकाज पाहणा-या चमकौर सिंह आणि डॉक्टर नैन नावाच्या दोन व्यक्तींपर्यंत पोहचविण्यात आली होती.
एनडीटीव्ही इंडियाच्या वृत्तानुसार, हरियाणा पोलिसांच्या इंटेलिजेंस सुत्रांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या चमकौर सिंह आणि नैन हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डेरातर्फे ही रक्कम पंचकूलात २३ ऑगस्टपासून हजारोंच्या संख्येत डेरा समर्थक बोलविण्यासाठी तसेच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी देण्यात आली होती.
अशाच प्रकारे पंजाबमध्ये डेरा समर्थकांची गर्दी जमविण्यासाठी कोट्यावधी रुपये पाठविण्यात आले होते. तसेच या समर्थकांना पंजाबमध्ये पाठविण्यासाठी गाड्यांची व्यवस्था, राहण्याखाण्यासाठी ही रक्कम वापरण्यात येणार होती. इतकेच नाही तर जे समर्थक पब्लिक ट्रान्सपोर्टने येत होते त्यांना त्यांचा प्रवास भत्ताही दिला जात होता.