Protest On Nupur Sharma Remarks: नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय गदारोळ उडाला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोकांनी पोस्टर आणि बॅनर घेऊन निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते सहारनपूरपर्यंत शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी जोरदार निदर्शने केली आणि भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली.
प्रयागराजच्या अटाळा भागात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. हे सर्व लोक घोषणाबाजी करत नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी करत होते. पोलिसांनी सगळीकडे नाकेबंदी केली आहे. घटनास्थळी पोलीस पीएसी आणि रॅपिड अॅक्शन फोर्स हजर आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून लोकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामाने आंदोलन न करण्याचे आवाहन केलं होतं.
दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम म्हणाले 'विरोध कोण करत आहेत हे आम्हाला माहीत नाही. मला असे वाटते की हे लोक AIMIM किंवा ओवेसीशी संबंधित लोक आहेत. त्यांना आंदोलन करायचे असेल तर ते करू शकतात पण आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे.
अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम
भाजपच्या निलंबित नेत्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यूपीच्या देवबंद जिल्ह्यात निदर्शने करण्यात आली. आरोपी नुपूरच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. गैरवर्तन करणाऱ्यांना माफ करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणं आहे. अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.