आताची मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आंतरराष्ट्रीय नंबरवरुन धमकीचे कॉल

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जी प्रकरणाचा काय आहे संबंध

Updated: Jan 10, 2022, 02:08 PM IST
आताची मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आंतरराष्ट्रीय नंबरवरुन धमकीचे कॉल title=

नवी दिल्ली : देशातील आताची सर्वात मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून धमक्या देण्यात आल्या आहेत. हे कॉल्स इंग्लंडच्या क्रमांकावरून करण्यात आले आहेत. शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेकडून वकिलांना स्वयंचलित फोन कॉल्स आले आहेत. 

कॉलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवरून समोर आलेल्या माहितीनुसार कॉलरने पंजाबमधील शेतकरी आणि शीख यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि मोदींना मदत करू नये असं म्हटलं आहे.  शिख दंगे आणि नरसंहारातील एकाही गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकलेली नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं, असंही या धमकीत म्हटलं आहे.

5 जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ताफा अडवण्याची जबाबदारी शीख फॉर जस्टिसने घेतली आहे. तसंच शेतकरी आंदोलनाला बेकायदेशीरपणे निधी दिल्याप्रकरणीही शीख फॉर जस्टिसचं नावही समोर आलं होतं.

सुमारे डझनभर वकिलांनी धमकीच्या क्लिप मिळाल्याचा दावा केला आहे. वकील या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. 

गुरपतवंत सिंग पन्नू हा खलिस्तान समर्थक संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे. भारतात अशांतता पसरवण्यासाठी तो वारंवार प्रक्षोभक आणि खोट्या बातम्यांचे व्हिडिओ जारी करत असतो. पन्नूच्या क्लिप्स आतापर्यंत भारतात अनेकांना पाठवण्यात आल्या आहेत.

पीएम मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या चौकशी समितीमध्ये चंदीगडचे डीजीपी, एनआयएचे आयजी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि पंजाबचे एडीजीपी यांचा समावेश असेल.