नवी दिल्ली : एखादा गुन्हा केल्या प्रकरणी पोलीस आरोपीला बेड्या ठोकत असल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, दिल्ली पोलीस दलातील एका पोलिसाचा विचित्र चेहरा समोर आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
ज्यांच्यावर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने पैशांच्या लालचेपोटी चोरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दिल्लीतील गाजीपूर परिसरात दिल्ली पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलने आपल्या मित्रासोबत मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्याकडील पैसे घेऊन फरार झाला. या आरोपानंतर आरोपी पोलिसाला अटक केली आहे.
दिल्ली पोलीस दलातील एक कॉन्स्टेबल आणि त्याच्या मित्रावर मारहाण करुन पैसे चोरी केल्याचा आरोप लावण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी गाजीपूर परिसरात कॉन्स्टेबल इदरीश आणि त्याचा मित्र जयप्रकाशने एका बाईकस्वाराला मारहाण करुन त्याच्याकडील ४ हजार रुपये लुटले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बाईकस्वाराचं नाव तस्लीम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी परिसरात खूपच अंधार होता आणि त्याचाच फायदा घेत आरोपींने हे कृत्य केलं. पीडित तरुणाकडून पैसे घेऊन आरोपींने पलायन केलं. या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
सुरुवातीला पोलीस आरोपींविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कॉन्स्टेबल इदरीश आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या.