Air Pollution : मुंबईसह महाराष्ट्रातील हवेती पातळी ढासळत असतानाच शहरी भागांमध्ये तुलनेनं हा धोका अधिक प्रमाणात जाणवत असल्यामुळं आता प्रशासन सतर्क झालं आहे. जिथं मुंबईमध्ये बांधकामं थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत तिथंच दिल्लीमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळं नागरिकांना श्वास घेणंही कठीण होऊन बसलं आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणानं आता धोक्याची पातळी ओलांडली असून, दिल्ली आणि हरियाणा भागातील शालेय विद्यार्थ्यांना या प्रदूषणाच्या विळख्यात येऊ न देण्यासाठी प्रशासनानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुग्राम आणि फरिदाबाद प्रशासनाकडून शिशूवर्ग ते पाचवी इतत्तेपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरपर्यंत हे निर्देश लागू असतील अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय मागील आठवड्यापासून धोक्याच्या पातळीच्या वरच राहिला. तर, सोमवारी हा आकडा 412 वर पोहोचला. जिल्ह्यावर घोंगावणारं हे संकट पाहता तातडीनं हे निर्देश लागू करण्यात आले. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय दिनचर्येत खंड पडू नये यासाठी Online Class द्वारे शाळा सुरु राहील असंही त्यांनी सूचित केलं.
दिल्ली एनसीआर पट्ट्यामध्ये प्रदूषण अतिशय वाईट वळणावर पोहोचलं असून त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरम्यान सध्याच्या घडीला प्राथमिक स्तरावर प्रशासनानं सर्व शासकीय शिक्षण संस्थांसाठी शाळा बंद ठेवण्याचा नियम लागू केला आहे.