नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोन आरोपींच्या फाशीवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. शिक्षेची अंमलबजावणी लांबवणीवर टाकू नका अशी विनंती सॉलिसिटर जनरल यांनी न्यायाधीशांना केली आहे. दोषींना फाशी देण्यास विलंब होत असल्याने गृह मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाच्या याचिकेवर निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना नोटीस पाठवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तिहार जेल अधीक्षकांनाही नोटीस पाठवली आहे. चारही आरोपींची फाशी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र आरोपींकडून वारंवार याबाबात कोर्टात धाव घेतली जात आहे. आज दुपारी ३ वाजता याबाबत सुनावणी होणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयातील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शनिवारी निर्भयाच्या चारही दोषींना वेग-वेगळी फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. ही प्रक्रिया अशाच प्रकारे सुरु राहिल्यास केस कधी संपणार नसल्याचंही ते म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालयात सरकारने, निर्भयाचे दोषी कायद्याशी खेळत असल्याचं सांगितलं.
याआधी निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माने केलेली दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती. या चारही दोषींना शनिवारी १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती, परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.
निर्भया प्रकरणी दोषींची फाशी न्यायालयाच्या आगामी निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पटियाला कोर्टाचे न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी फाशी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पत्र तिहार तुरूंग प्रशासनाकडे पाठवण्यात आलं आहे.
दोषींना फाशी देण्यासंदर्भात ब्लॅक वॉरंट १ फेब्रुवारीचे निघालं होतं. मात्र चौघांपैकी एक दोषी असेलेल्या विनयने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. त्यामुळे फाशीची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नियोजित कार्यक्रमानुसार दोषींना फासावर लटकवण्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली होती. त्याचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं होतं, असं तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केलं होतं.
याआधी निर्भया प्रकरणातील दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. पण या प्रकरणाला आता सतत तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अरोपींना नक्की फाशी देणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.