उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका

उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

Updated: Jul 28, 2018, 10:29 PM IST
उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ, दिल्ली-युपीत पुराचा धोका title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टी आणि वीज पडून ५८ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी सखल भागांमध्ये घुसण्यास सुरुवात झाल्याने धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंडमध्येही अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे तेथेही पुराचा धोका वाढला आहे.

दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपात्कालीन बैठक बोलावली. नदी किनारी भागातील रहिवाश्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. तर हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आहे. दरम्यान, देशातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात, नवी दिल्लीत जोरदार पाऊस झाला. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. किनारी भागातील लोकांना धोकाचा इशारा देण्यात आलाय.

 उत्तर हरियाणा, चंडीगड, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा; तसेच रायलसीमा, तमिनळनाडू, लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.