Delhi Crime : पूर्व दिल्लीतील (Delhi News) मंडावली रेल्वे पुलाजवळ एका 72 वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पोलिसांनी (Delhi Police) आता या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी तीन गुरुग्राममधील आहेत. सुधा गुप्ता असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असल्याची माहित समोर आली आहे. मुख्य आरोपी असलेल्या प्रॉपर्टी डीलरने दोन दूध विक्रेत्यांच्या मदतीने वृद्ध महिलेच्या काही मालमत्तेवर ताबा मिळण्यासाठी कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.
मंगळवारी दिवसाढवळ्या स्कूटीवरुन जाणाऱ्या सुधा गुप्ता यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. जखमी सुधा गुप्ता यांना प्रीत विहार येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुधा गुप्ता यांना मृत घोषित केले. हल्ल्याच्या वेळी सुधा गुप्ता आपल्या घराचे भाडे जमा करून मंडावलीहून लक्ष्मीनगरला घरी जात होत्या. दुकानाबाहेर गाडी लावणाऱ्या एका व्यक्तीनेच सुधा गुप्ता यांची हत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
सुधा गुप्ता यांची हत्या करण्यासाठी शस्त्र किंवा चाकू वापरायचा का, अशी विचारणा त्यांनी एका व्यक्तीकडे केली होती. मोनू डेधा उर्फ चाचा (26), पुष्पेंद्र यादव उर्फ अय्या (18), सार्थक नगर उर्फ लड्डू (19) आणि विकास चौधरी उर्फ लल्ला (20) अशी आरोपींची नावे आहेत. डेधा हा प्रॉपर्टी डीलर आहेत तर सार्थक नगर आणि चौधरी दूध विकण्याचे काम करतात, अशी माहिती पोलिस उपायुक्त (पूर्व) अमृता गुगुलोथ यांनी दिली. त्यांच्याकडून बाईक, कार आणि घटनेदरम्यान घातलेले रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
डेधा याची गुप्ता यांच्या पाच-सहा मालमत्तांवर नजर होती. गुप्ता आपली मालमत्ता भाड्याने देत असल्याचे डेधाला माहीत होते. तिन्ही आरोपींना एका अज्ञात व्यक्तीचा सल्ला घेतला आणि गुप्ता यांना पिस्तूल, चाकू किंवा बर्फ तोडायच्या हत्याराने मारायचे का, याबाबत माहिती घेतली होती. आरोपींनी कट रचण्यापूर्वी खून कसा करायचा याचे व्हिडिओही यूट्यूबवर पाहिले होते. डेधा, यादव आणि अय्या यांनी तीन बर्फ तोडायचे हत्यारही घेतले होते. हत्येनंतर तिघेही हरियाणातील रिठोज गावात सहकाऱ्याच्या घरी थांबले होते.
आरोपी घरभाडे घेऊन जाणाऱ्या सुधा गुप्ता यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर अचानक आरोपी गुप्ता यांच्या घराच्या जवळ येऊन थांबले. त्यानंतर सर्वांनी मिळून गुप्ता यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला हा अपघात वाटत होता मात्र नंतर गुप्ता यांच्याव धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. गेल्या 10-15 दिवसांपासून खुनाचा कट रचला जात होता अशी माहिती समोर आली आहे.