बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच...

Delhi Crime : दिल्लीतल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणामध्ये हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या मुलाचा मृतदेह शोधत आहेत.

आकाश नेटके | Updated: Jan 27, 2024, 11:59 AM IST
बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच... title=

Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सहायक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) हा 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्यानंतर लक्ष्यच्या मित्राला अटक केल्यानतंर धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्ष्यची हत्या करुन त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याचा दावा आरोपी मित्राने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. व्यवसायाने वकील असलेला लक्ष्य, तीस हजारी कोर्टात लिपिक म्हणून काम करणारा विकास भारद्वाज आणि अभिषेक या दोघांसोबत 22 जानेवारी रोजी हरियाणातील भिवानी येथे एका एसयूव्ही गाडीमध्ये लग्नासाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यामुळे यशपाल चौहान यांनी मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी लक्ष्य चौहानचा शोध सुरू केला. पोलिसांनी अभिषेकला नरेला येथील पंजाबी कॉलनीतून अटक केली. चौकशीत अभिषेकने खुलासा केला की, "22 जानेवारीला दुपारी विकासने मला फोन केला होता. त्याने हरियाणातील सोनीपत येथे एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास सांगितले. त्याने लक्ष्यला सोबत येण्यास सांगितले. विकासने मला असेही सांगितले की लक्ष्य नावाचा एक वकील आहे जो तीस हजारी कोर्टात प्रॅक्टिस करतो. त्याने माझ्याकडून कर्ज घेतले आहे. जेव्हा मी त्याच्याकडे पैसे परत मागितले तेव्हा तो माझ्याशी गैरवर्तन करत आहे."

त्यानंतर अभिषेक आणि विकासने लक्ष्यला संपवण्याची योजना केला. त्याचा खून करून मृतदेह मुनक कालव्यात फेकून देण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. 22 जानेवारीला अभिषेक दुपारी साडेतीन वाजता मुकरबा चौकात पोहोचला. तिथे काळ्या रंगाच्या कारमध्ये त्याची लक्ष्याशी भेट झाली. तो लक्ष्यासोबत गाडीत बसला. नंतर विकास त्यासोबत सामील झाला. रात्री तिघेही हरियाणातील भिवानी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. रात्री 12 वाजता ते घराकडे निघालो. यावेळी तिघेही लघुशंकेला जाण्यासाठी एका ठिकाणी थांबले. त्यावेळी लक्ष्य एका कालव्याजवळ उभा होता. त्यानंतर अभिषेक आणि विकास यांनी लक्ष्यला धक्का दिला. त्यानंतर दोघेही तेथून लक्ष्याच्या कारसह पळून गेले. विकासने अभिषेकला नरेला येथे सोडले आणि तो स्वतः तिथून पळून गेला. 

दरम्यान, 23 रोजी लक्ष्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तीन दिवसांच्या शोधानंतर 26 जानेवारीला लक्ष्याच्या हत्येची बातमी समोर आली. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस लक्ष्याच्या मृतदेहाचाही शोध घेत आहेत. सर्व पुराव्यांच्या आधारे या प्रकरणी आरोपी अभिषेकला अटक करण्यात आली आहे. लक्ष्य आणि आरोपी विकास यांचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.