Delhi Cold Wave : उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशपर्यंत हाडं गोठवणारी थंडी आहे. धुके आणि बर्फाच्छादित वाऱ्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत शनिवारी किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच राजधानी दिल्लीच्या अनेक भागात दाट धुकेही कायम आहे. अशातच थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाय केले जात आहे. त्यातच शेकोटीमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.
दिल्लीत एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दुसर्या ठिकाणी, दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी, शेकोटी पेटवून हे सर्व लोक खोलीत झोपले होते. यावेळी खोलीत धुराचे लोट पसरले. यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा दुसरीकडे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला आणि सर्वांचे मृतदेह बाहेर काढले.
दिल्लीत थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवून झोपण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एक घटना इंद्रपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी अलीपूर येथे घडली आहे. रात्रीच्या थंडीपासून वाचण्यासाठी या लोकांनी शेकोटी पेटवली होती. मात्र शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत अलीपूरमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचाही समावेश आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांपैकी एक 7 वर्षांचा तर दुसरा 8 वर्षांचा आहे. रात्री शेकोटी पेटवून ते झोपले असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर घबराट पसरली होती. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दुसऱ्या घटनेत पश्चिम दिल्लीतील इंद्रपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांचा मृत्यू झाला आहे. इंद्रपुरी भागात दोन लोक घरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्याच्या घरात शेकोटी जळत होती. बेशुद्ध सापडल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. दोघेही मूळचे नेपाळचे आहेत. मृतांमध्ये 56 वर्षीय पुरुष आणि 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी घरात शेकोटी पेटवली होती.
दरम्यान, कोळसा जाळून शेकोटी पेटवल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडसारखे वायू बाहेर पडतात, जे विषारी असतात. जर कोणी बंद खोलीत जळत्या शेकोटीसह झोपलं तर कार्बन मोनोऑक्साइड वायूची पातळी लक्षणीय वाढते आणि तिथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. कार्बन मोनोऑक्साइडमध्ये कार्बन असतो, ज्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते तेव्हा धोकादायक कार्बन मोनोऑक्साइड वायू फुफ्फुसात पोहोचतो आणि रक्तात मिसळतो. हे बराच वेळ सुरु राहिल्यास रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊ लागतो आणि यानंतर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.