दहशतवाद्यांनी भारतीय जवानाचे अपहरण केल्याचे वृत्त खोटे, संरक्षण मंत्रालयाचा खुलासा

यासीन लष्कराच्या तळावर सुखरुप पोहोचल्याचे समजते.

Updated: Mar 9, 2019, 09:47 AM IST
दहशतवाद्यांनी भारतीय जवानाचे अपहरण केल्याचे वृत्त खोटे, संरक्षण मंत्रालयाचा खुलासा title=

नवी दिल्ली: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका भारतीय जवानाचे घरात घुसून अपहरण केल्याचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. लष्करातील जवान मोहम्मद यासीन याचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याच्या बातम्या शुक्रवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. जम्मू-काश्मीर लाइट इन्फॅन्ट्री रेजिमेंटमध्ये तैनात असलेल्या मोहम्मद यासीनचे काही लोकांनी बडगाममधील चोडूपोरा भागात असलेल्या काजीपोरामधील त्याच्या घरातून अपहरण केल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी २०१७ मध्ये दहशतवाद्यांनी लेफ्टनंट उमर फैयाज आणि २०१८ मध्ये शिपाई औरंगजेब यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. त्यामुळे मोहम्मद यासीन यांच्या अपहरणाच्या बातमीने साहजिकच मोठी खळबळ उडाली होती. मात्र, ताज्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला यासीन जम्मू-काश्मीर लाइट इन्फॅन्ट्रीच्या रेजिमेंटल केंद्रावर पोहोचल्याचे समजते. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर या तणावात आणखीनच भर पडली होती. याशिवाय, जम्मू बस स्थानकावर नुकताच ग्रेनेड हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर लष्करी सुरक्षेत कमालीची वाढ होऊनही मोहम्मद यासीनच्या अपहरणाची बातमी आल्याने चिंता वाढली होती. मात्र, सुदैवाने हे वृत्त खोटे ठरले आहे. दरम्यान, याविषयी लष्कराकडून सविस्तर खुलासा होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.