दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका नीलम शर्मा यांचं निधन

गेल्या काही काळापासून...

Updated: Aug 18, 2019, 09:09 AM IST
दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका नीलम शर्मा यांचं निधन  title=
छाया सौजन्य- व्हिडिओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बडी चर्चा आणि तेजस्विनी अशा कार्यक्रमांसोबतच दूरदर्शनच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे वृत्तनिवेदन करणाऱ्या नीलम शर्मा यांचं शनिवारी निधन झालं. दूरदर्शनच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आली. त्या ५० वर्षांच्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार गेल्या काही काळापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. 

जवळपास गेल्या पंचवीस वर्षांपासून दूरदर्शनमध्ये कार्यरत असणाऱ्या नीलम यांनी १९९५ मध्य़े या क्षेत्रातील त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. न्यूज रिडर पासून न्यूज अँकर पर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांनाच हेवा वाटेल असा होता. यंदाच्या वर्षी त्यांना नारी शक्ती या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. वृत्तनिवेदनासोबतच त्यांनी दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीसाठी  विविध कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं होतं. 

विविध वाहिन्यांच्या आणि तितक्याच वृत्तनिवेदकांच्या स्पर्धेतही नीलम यांची लोकप्रियता कायम होती. दूरदर्शनप्रती असणारी विश्वासार्हता आणि या वाहिनीचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग यांच्यासाठी नीलम यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे ट्विट पाहून याचा प्रत्यय आला. ज्यामध्ये अनेकांनीच नीलम यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केलं होतं.