सरकारवरील टीकेनंतर राहुल बजाज भाजप नेते, मंत्र्यांच्या निशाण्यावर

एकिकडून वक्तव्याचं स्वागत तर दुसरीकडून.... 

Updated: Dec 2, 2019, 09:21 AM IST
सरकारवरील टीकेनंतर राहुल बजाज भाजप नेते, मंत्र्यांच्या निशाण्यावर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बजाज उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या राहुल बजाज यांनी सरकारी धोरणं आणि एकंदरच सरकारवर टीका करण्याबाबत उद्योजकांमध्ये आत्मविश्वासाच्या भावनेचा अभाव आणि भीतीचं वातावरण असल्याचं वक्तव्य करत साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. ज्यानंतर भाजप नेते आणि काही मंत्रीमहोदयांनी त्यांच्या या वक्तव्यावर काहीशा नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आपलं मतद अशा पद्धतीने पसरवण्यापेक्षा प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचे आणखीही काही चांगले मार्ग आहेत, असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राहुल बजाज यांच्या वक्तव्याने राष्ट्रहिताला ठेच लागू शकते असं मत मांडलं. मंत्री हरदीप सिंग यांनीही असाच काहीसा सूर आळवत, बजाज यांनी स्वत:चं मत मांडलं आणि इतरांनाही त्याच्याशी सहमत होण्यास प्रवृत्त केलं, हीच लोकशाही आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अमित शाह यांच्याच म्हणण्याचा आधार घेत कोणालाही कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या द इकोनॉमिक टाईम्सच्या एका कार्यक्रमात राहुल बजाज यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मांडलं होतं. या कार्यक्रमाला खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची उपस्थिती होती. 

देशातील उद्योजकांना सरकारची भीती-  राहुल बजाज

उद्योग विश्व आणि देशात सत्तेवर असणाऱ्या पक्षातील या मंडळींसमोर बजाज यांनी काही गोष्टी ठामपणे मांडल्या. देशात सध्या उद्योजक वर्तुळात (सर्वांमध्ये) भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जनता सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. बजाज यांच्या या वक्वत्वावर अमित शाह यांनी त्या कार्यक्रमातच उत्तर दिलं होतं. प्रश्नोत्तराचं हे सत्र सध्या उद्योग, राजकीय आणि एकंदरच साऱ्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे.