Live Location : महाराष्ट्रापासून Cyclone Mocha किती दूर? घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या हवामानाचा अंदाज

Cyclone Mocha Impact On Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सक्रिय असणारा अवकाळी पाय काढताना दिसत नाहीये. त्यातच मोका चक्रिवादळाच्या इशाऱ्यामुळं राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

Updated: May 11, 2023, 08:00 AM IST
Live Location : महाराष्ट्रापासून Cyclone Mocha किती दूर? घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या हवामानाचा अंदाज  title=
Cyclone Mocha Impact On Weather Live tracking Rain predictions Maharashtra latest news

Cyclone Mocha Impact On Weather : महाराष्ट्रात सुरु असणारा अवकाळी आणखी काही दिवस मुक्काम वाढवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरीही दुसरीकडे राज्यात तापमानाचा आकडा वाढत चालल्याची बाब नाकारता येणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मोका या चक्रिवादळामुळं ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरीही राज्यात बरसणारा पाऊस मात्र अवकाळीचा असून, त्यामध्ये अंशत: वादळाचे परिणाम दिसून येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : अवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती

चक्रिवादळ सक्रीय आता पुढे काय? 

अंदमानच्या समुद्रात तयार झालेलं चक्रिवादळ मोका सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वेकडे सक्रिय असून, हे ठिकाणं पोर्ट ब्लेअरपासून 540 किमी दक्षिण पश्चिमेकडे आहे, तर म्यानमारपासून 1350 दक्षिणपूर्वेला असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढे हे वादळ उत्तर पश्चिमेला मार्गस्थ होणार आहे. 12 मे 2023 ला मोका चक्रिवादळ अतीगंभीर रुप धारण करणार आहेत. ज्यानंतर ते उत्तर पूर्व दिशेलाच पुन्हा वळेल. परिणामी दक्षिण पूर्व बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तर किनारपट्टीवर अती मुसळधार पाऊस बरसेल. 

देशातील अनेक राज्यांना पावसानं झोडपलं 

मागील 24 तासांतील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास उत्तराखंड, कर्नाटकचा दक्षिण किनारपट्टी भाग, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसानं हजेरी लावली. तर, केरळ आणि अंदमान- निकोबारमध्येही पावसानं धुमाकूळ घातला. सिक्कीम, आसाम, छत्तीसगढसोबत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. 

पुढच्या 24 तासांत उत्तरेकडील राज्यांना बर्फवृष्टीचा तडाखा बसणार... 

येत्या दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढणार आहे. तर, अंदमान-निरोबार बेट समुहामध्ये पावसाची हजेरी असणार आहे. किनारपट्टी भागांना पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वारे वाहणार असल्याचा इशारा असून, अंदमानच्या पट्ट्यातील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळं या भागातील पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. 

देशाच्या अती उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांविषयी सांगावं तर, हिमाचल आणि काश्मीरच्या डोंगररांगांमध्ये हिमवृष्टी होऊ शकते. उत्तराखंडमध्येही केदारघाटी आणि नजीकच्या भागात बर्फवृष्टीची हजेरी असेल. ज्यामुळं चारधाम यात्रेवर याचे थेट परिणाम होताना दिसणार आहेत. त्यामुळं यात्रेच्या निमित्तानं या भागात असणाऱ्या आणि आगामी दिवासंमध्ये इथं येणाऱ्या नागरिकांनाही हवामानाचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.