'फॅनी'चा तुफान वेग... सुरक्षा दलाला हायअलर्ट

ओडिशा आणि कोलकाता भागात फॅनीमुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तीशी लढण्यासाठी पथकं तैनात

Updated: May 2, 2019, 04:09 PM IST
'फॅनी'चा तुफान वेग... सुरक्षा दलाला हायअलर्ट title=

भुवनेश्वर / नवी दिल्ली : 'फॅनी' चक्रीवादळ वेगाने पूर्व किनारपट्टीकडे मार्गक्रमण करतंय. विशाखापट्टणमपासून चक्रीवादळ अवघ्या २३० किलोमीटरवर आहे. तर ओडिशातल्या जगन्नाथ पुरीपासून हे चक्रीवादळ ४२० किमी अंतरावर आहे. उद्या ओडिशातल्या तंदाहार भागात 'फॅनी' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या समुद्रात असलेल्या या चक्रीवादळाचे जमीनीवर धडकण्यापूर्वी १८५ किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहात आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळ शिरण्यापूर्वी ओडिशाच्या जगसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक आणि बालासोर भागाला तडाखा बसण्याची चिन्हं आहेत. ओडिशा आणि कोलकाता भागात फॅनीमुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तीशी लढण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच भारतीय नौदलही कोणत्याही आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज आहे. रेल्वेनेही विशेष व्यवस्था केली आहे.

या भागातील सुरक्षा दलाला हायअलर्ट देण्यात आलाय. शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच समुद्र किनाऱ्यावरच्या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या आठ लाखांहून जास्त जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

भारतीय हवामान विज्ञान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बंगाल खाडीवरून जगन्नाथ पुरीच्या दिशेनं दक्षिण-दक्षिण पश्चिम भागातील हे वादळ ओडिशा किनाऱ्याकडे सहा किलोमीटर प्रतितासानं प्रवास करतंय.

१९९९ साली आलेल्या सुपर सायक्लॉननंतर 'फॅनी' हे अतिशय धोकादायक चक्रीवादळ समजलं जातंय. यामुळे जगन्नाथ पुरी भागाला धोक्याची शक्यता निर्माण झालीय.