भुवनेश्वर : फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार उडाला आहे. वादळामुळे शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागात अजूनही पाणी आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची तटरक्षक दलाकडून हवाई पाहणी करण्यात आली. फॅनी चक्रीवादळ आता बांग्लादेशात पोहोचले आहे. पण त्याआधी शुक्रवारी या वादळाने जो काही उत्पात ओडिशा घडवला, त्याची दृष्यं काळजाचा थरकाप उडवणारी आहेत. पण नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करावा याचं उत्तम उदाहरण ओडिशानं घालून दिले आहे.
ओडिशाने देशातलं सर्वात गरीब राज्य, पण गेल्या ७२ तासात ओरिशाने जे साधले ते भल्या भल्यांना डोळ्यात अंजन घालणारे आहे. फॅनी ओरिशाच्या किनाऱ्यावर धडकले त्यावेळी त्याचा वेग ताशी २०० किमी होता. पण वादळ येणार हे कळल्यावर ओरिशा सरकारनं ज्या वेगात पावलं उचलली त्यावेगानं फॅनीचा नांगीच ठेचून टाकली. निसर्गाच्या रौद्र रुपाला नवीन पटनायक आणि त्यांचं प्रशासन ज्या प्रकारे सामोरं गेले, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. १ मे रोजी ओरिशात अतितीव्र फॅनी वादळ धडकणार असल्याची इशारा सर्वदूर देण्यात आला.
ओरिशामधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणात तातडीनं कामाला लागली १७ जिल्ह्यात वादळाचा प्रभाव पडणार होता.
फॅनी तासागणिक ओडिशाच्या किनाऱ्याकडे येते होते. मुसळधार पाऊस सुरू झाला होता. पण अधिकारी, कर्मचारीही तितक्याच वेगाने कामाला लागले होते. फक्त ४८ तासात १२ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यासाठी प्रशासनासने सुमारे १ कोटी २० लाख एसएमएस पाठवले. गावा गावा दवंड्या पिटण्यात आल्या, ४० हजार स्वयंसेवक एका रात्रीत उभे राहिले.
घरोघरी जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत होते. गेल्या २० वर्षात किनारपट्टीच्या जिल्ह्यात उभारलेली ७३९ आश्रयस्थळे फॅनीच्या संकटात लाखोंचा आधार ठरली.
१९९९ साली ओडिशात चक्रीवादळाने हाहाकार उडाला. आधीच मागासलेले राज्य दशकभर मागे गेले. शेकडो लोकांचे प्राण गेले. गेल्या वीस वर्षात नवीन पटनायकांनी राज्याची घडी पुन्हा वसवताना आपत्ती व्यवस्थापनाचा नवा वस्तूपाठ घालून दिला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत लष्कर किंवा नौदलाचा किमान वापर करण्यात आला. पण जीवितहानी टाळली असं म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. आता वादळानंतर लाखो कुटुंबाच्या पूनर्वसनाचं मोठे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे.