बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.    

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 13, 2023, 04:09 PM IST
बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर title=

Biparjoy Cyclone Update in Gujarat : बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केले आहे. या अतितीव्र झालेल्या चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर पडणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झाले आहे. दरम्यान गुजरातमधील चक्रीवादळाचा प्रभाव पडणाऱ्या काही भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती गुजरात सरकारकडून देण्यात आली आहे. तर या चक्रीवादळामुळे गुजरातच्या 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये 10 किमीच्या परिसरातली गावं खाली करण्यात आली आहेत. कच्छमध्ये कलम 144 लावण्यात आलंय. तीन दिवसांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार

हे चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. अरबी समुद्रात सुरु झाले चक्रीवादळ 'बिपरजॉय' 14 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्यामुळे आतापासून खबरदारी घेण्यात येत आहे.

बिपरजॉय चक्रीवादळचा गुजरातच्या उत्तर किनारपट्टीला मोठा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे, त्यामुळे येथील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील 500, कच्छ-6786, जामनगर-1,500, पोरबंदर-543, द्वारकामधून 4820, गीर-सोमनाथमधून 408, मोरबी- 2,000 आणि राजकोटमधून- 4,031 इतक्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

अतिमुसळधार पावसाचा अंदाज 

 ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळामुळे गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चक्रीवादळामुळे गुजराजतमधील हे जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट असल्याने चक्रीवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.  गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी बिपरजॉय हे चक्रीवादळ धडकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने गुजरातेत ऑरेंज अलर्ट दिला आहे.