कोरोना संकटकाळात 'या' जिल्ह्यांवर घोंघावतोय चक्रीवादळाचा धोका

 देशातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात 

Updated: May 17, 2020, 11:22 AM IST
कोरोना संकटकाळात 'या' जिल्ह्यांवर घोंघावतोय चक्रीवादळाचा धोका title=

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे निसर्गाच्या प्रकोपाला देखील सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान बंगालच्या खाडीत अम्फान नावाचे चक्रीवादळ घोंघावतंय. देशातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. 

चक्रीवादळच्या पार्श्वभुमीवर बंगालच्या सागरी किनाऱ्यावर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या वादळामुळे ओडीसा, छत्तीसगड, बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील अलर्ट जाहीर करण्यात आलाय. पाच ते सहा दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. 

छत्तीसगडच्या सुकमामध्ये शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता वादळाने थैमान घातले. या वादळामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले तसेच असंख्य नागरिकांचे नुकसान झाले.

संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ मे रोजी राज्याच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा रविवार संध्याकाळपर्यंत चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. १८ ते २० मे दरम्यान हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना इशारा 

उत्तर आणि दक्षिणचे २४ जिल्हे, कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा आणि हुगलीसहीत पश्चिम बंगालच्या सागरी क्षेत्रात १९ ते २० मे पर्यंत मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १७ मेपर्यंत परतण्याचा आवाहन करण्यात आले आहे.