पंजाबमध्ये कर्फ्यूची घोषणा, महाराष्ट्रात ही संचारबंदीची जितेंद्र आव्हाडांकडून मागणी

राज्यातील जनता अजूनही कोरोनाच्या बाबतीत गंभीर नाही.

Updated: Mar 23, 2020, 02:46 PM IST
पंजाबमध्ये कर्फ्यूची घोषणा, महाराष्ट्रात ही संचारबंदीची जितेंद्र आव्हाडांकडून मागणी title=

नवी दिल्ली : संपूर्ण पंजाब राज्यात कोरोनामुळे कर्फ्यू लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली सह मोठ्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. पण तरी देखील लोकं रस्त्यावर उतरत आहेत. गरज नसताना ही लोकं गर्दी करत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची वाढती प्रकरणं पाहता पंजाब सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यात कर्फ्यू लावला आहे. पंजाब सरकारला हे कडक पाऊल उचलण्यासाठी लोकांनाची भाग पाडलं. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सरकारने संपूर्ण राज्यात कर्फ्यू लावत असल्याची घोषणा केली.

अनेक ठिकाणांहून लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याच्या बातम्या येत आहेत. केंद्र सरकारने यानंतर संपूर्ण राज्य सरकारांना पत्र लिहून ज्या राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. अशा राज्यांमध्ये लोकांना कायद्याचं पालन करवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत कलम १४४ चे पालन करण्याची विनंती केली आहे. कृपया हे गंभीरपणे घ्या. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची खेळू नका. रस्त्यावर गर्दी करु नका. आज मुंबईमध्ये लोकं आपल्या गाड्या घेऊन निघाले असताना ही गंभीर स्थिती समोर आली. मुलुंड चेकनाक्यावर लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत राज्यात संचारबंदी लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लोकं ऐकत नसल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर गेली आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने राज्यावर संकट ओढावण्याची चिन्ह आहेत. पण लोकं याला गंभीरपणे घेताना दिसत नाहीयेत.