Summer Vibes: एयर इंडियाच्या विमान प्रवासात आता मिळणार कैरीचं पन्ह

एयर इंडियाद्वारे खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेत केल्या गेलेल्या बदलाबाबत विमानातील क्रू मेंबरचेही मत विचारात घेण्यात आले आहे.

Updated: Mar 27, 2019, 11:39 AM IST
 Summer Vibes: एयर इंडियाच्या विमान प्रवासात आता मिळणार कैरीचं पन्ह  title=

नवी दिल्ली : विमान कंपनी एयर इंडियाकडून खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेत पूर्णत: बदल केले जाणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत एयर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ग्रीन सलाडच्या जागी दही-भात दिला जाणार आहे. तर बिजनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना २४ तास कॉफीची सुविधा दिली जाणार आहे. भारतीय मिठाईसोबत फ्रूट ज्यूसऐवजी आंब्याचं पन्ह आणि जलजीरा देण्यात येणात आहे. एयर इंडियाकडून १ एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

एयर इंडियाने प्रवाशांना तळलेल्या पदार्थांऐवजी उपमा आणि पोहे चहासोबत देण्यात येण्याचे सांगितले आहे. ट्रॅडिशनल इंडियन टच देणे आणि प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करत हे बदल केले गेले आहेत. आमचे लक्ष दर्जेदार, उत्तम प्रतिच्या चवीसह, पदार्थ सादरीकरणाकडे असल्याचे एयर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रवासादरम्यान प्रवाशांना फळं देण्याचा निर्णयही कंपनीकडून घेण्यात आला आहे. पदार्थांतील या बदलावाबाबत विमानातील क्रू मेंबरचेही मत विचारात घेण्यात आले होते. प्रवाशांना जेवण देण्याचे काम क्रू मेंबर करत असल्याने त्यांना प्रवशांच्या पसंतीचा अंदाज असतो. हे नवीन बदल पायलट प्रोजेक्ट म्हणून १ एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमानात सुरू करण्यात येणार आहे. 

एयर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या नवीन बदलांबाबत प्रतिक्रिया आल्यानंतरच हे बदल देशांतर्गत विमान प्रवासातही सुरू करण्यात येणार आहेत. एयर इंडिया दरवर्षी आपल्या कॅटरिंग सर्विसवर ८०० कोटी रूपये खर्च करते. आता कंपनीकडून आपल्या मेन्यूमध्ये दोन वर्षांनंतर बदल केले जात आहेत. याआधी कंपनीकडून देशांतर्गत उड्डाणादरम्यान मांसाहारी जेवण देण्यास बंदी घालण्यात आली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x