मुंबई : कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसली तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. येत्या वर्षाच्या सुरुवातीस कोरोना लस येणार अशी चिन्ह आहेत. दरम्यान कोरोना चाचणींची संख्या वाढणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत ९८० रुपयांऐवजी ७८० हा दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली.
राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ४५०० रुपयांवरुन आता ७८० रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.
राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
राज्याचा रुग्णवाढीचा दर हा ०.२१ इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतले.