coronavirus : ३ महिन्याच्या बाळाची कोरोनावर यशस्वी मात

हे बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून... 

Updated: Apr 28, 2020, 09:19 AM IST
coronavirus : ३ महिन्याच्या बाळाची कोरोनावर यशस्वी मात   title=
संग्रहित छायाचित्र

गोरखपूर : उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यांपूर्वी एका तीन महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोन महिन्यांनंतर तीन महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. या बाळावर आणि त्याच्या आईवरही उपचार सुरु होते. कोरोना झालेल्या एका नातेवाईकाकडून बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या नातेवाईकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

12 एप्रिल रोजी आई आणि बाळ दोघेही रुग्णालयात आले होते. या दोघांचीही दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीमध्ये आईचे रिपोर्ट निगेटिव्ह तर बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

डॉ. गणेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईला संक्रमणापासून वाचवणं हे डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं. बाळाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे बाळाच्या आईनेही सर्व आवश्यक ती काळजी घेतली. बाळाला तापाशिवाय दुसरी कोणतीच समस्या नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्याला पॅरासिटामोल देण्यात आलं. परंतु आईच्या दुधापासून प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे बाळावर इतर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत आणि तो कोणत्याही इतर औषधांविना बरा झाला.

 

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बाळाची आणि आईची चाचणी करण्यात आली. मात्र दोन्ही चाचण्यांमध्ये दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले.

कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर या आई आणि बाळाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून स्टॅन्डिंग ओव्हेशन देण्यात आलं.