मुंबई : देशभरामध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. यासाठी पंतप्रधानांनी पीएम केयर्स फंडाची स्थापना केली. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशातल्या उद्योगपतींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
व्यावसायिकांमध्ये टाटा ट्रस्टने १,५०० कोटी रुपये द्यायची घोषणा केली. तर मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधाला ५ कोटी रुपये देणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनने बीएमसीसोबत सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १०० बेडचं सेंटर उभारलं आहे. याशिवाय रिलायन्सने लोधीवलीमध्ये आयसोलेशन सेंटरही बनवलं आहे. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजने पंतप्रधानांच्या पीएम केयर्स फंडाला ५०० कोटी रुपये दिले आहेत.
महिंद्रा ग्रुप त्यांच्या फॅक्ट्रीतल्या युनिटमध्ये व्हॅन्टिलेटर बनवणार आहे. महिंद्रा ग्रुपचे चेयरमन आनंद महिंद्रा यांनी याची घोषणा केली आहे. याशिवाय महिंद्राने त्यांची हॉलीडे कंपनी क्लब महिंद्रा रुग्णांच्या देखभालीसाठी द्यायचा प्रस्तावही दिला आहे. याशिवाय महिंद्रा आपला संपूर्ण पगार कोरोना फंडासाठी देणार आहेत. हा फंड छोटे उद्योग आणि कमी पगारावर काम करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला आहे.
अदानी ग्रुपने कोरोनाचा सामना करण्यासाठी १०० कोटींची मदत केली आहे. तर इन्फोसिस ग्रुपनेही १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. यातले ५० कोटी रुपये पीएम केयर्स फंडासाठी देत असल्याचं इन्फोसिसने सांगितलं.
हीरो सायकल्सच्या पंकज मुंजाल आणि बजाज ग्रुपने प्रत्येकी १०० कोटी रुपयांची मदत केली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी व्हॅन्टिलेटर आणि इतर अत्यावश्यक सामान बनवणाऱ्यांना ५ कोटींची मदत देणार असल्याचं घोषित केलं आहे. सन फार्मा औषधं आणि सॅनिटायझर बनवण्यासाठी २५ कोटी रुपये देणार आहे. पारले कंपनीने पुढच्या तीन आठवड्यांमध्ये बिस्कीटांची ३ कोटी पॅकेट द्यायची घोषणा केली आहे.