Corona Third Wave : देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं कमी होतायत असं वाटत असतानाच त्यात पुन्हा वाढ होत असल्याचं दिसतंय. विशेषत: कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 9 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मृत्यूचं प्रमाण 121 टक्क्यांनी वाढलं आहे. 15 नोव्हेंबर रोजी देशभरात 197 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, हाच आकडा 23 नोव्हेंबरला 437 इतका होता.
दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतेने केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने आज 13 राज्यांना पत्र लिहून कोरोना चाचण्यांच्या घटत्या संख्येवर चिंता व्यक्त केली असून, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केलं आहे.
11 अधिकारी पॉझिटिव्ह
उत्तराखंड इथल्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 11 IFS अधिकारी कोरोना बाधित आढळले आहेत. यानंतर 48 अधिकाऱ्यांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे कर्नाटकातील धारवाड इथल्या एसडीएम मेडिकल कॉलेजमध्ये तब्बल 66 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे सर्व बाधित विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेतली होती. यानंतर 400 विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयाच्या इमारतीसोबतच दोन वसतिगृहंही सील करण्यात आली आहेत. आठवडाभरापूर्वी काही विद्यार्थी एका कार्यक्रमात आले होते. या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर सर्व पॉझिटिव्ह आढळले होते.
आरोग्य मंत्रालयाने लिहिलं राज्यांना पत्र
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 13 राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना चाचण्या कमी होत असतील तर संसर्गाचा योग्य अंदाज लावता येणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून बंगालसह अनेक राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह गोवा, जम्मू-काश्मीर, केरळ, लडाख, बंगाल, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांना पत्र लिहिलं आहे.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे की जर चाचणी योग्य प्रकारे केली गेली नाही तर लोकांमध्ये संसर्ग पसरण्याचा अंदाज लावणं कठीण होईल. त्यांनी बंगालच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव स्वरूप निगम यांना पत्र लिहून सांगितले की, जून 2021 पर्यंत दररोज सरासरी 67,644 चाचण्या घेतल्या जात होत्या, पण 22 नोव्हेंबरपर्यंत त्या 38,600 इतक्या कमी केल्या आहेत.
8.1.1529 व्हेरिएंटविषयी चेतावणी
याशिवाय, राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे सचिव यांना पत्र लिहिलं आहे. 8.1.1529 व्हेरिएंटच्या 19 प्रकरणांमध्ये 3 प्रकरणं बोत्सवाना, 6 प्रकरणं दक्षिण आफ्रिका आणि 1 प्रकरण हाँगकाँगमधलं आहे. या देशांतून प्रवास करणार्या किंवा येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी आणि चाचणी करावी. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा देखील तापस करुन चाचणी करावी असं सांगण्यात आलं आहे.