घरात गॅस चेंबर बनवून तिघांची आत्महत्या, दरवाजावर लिहिलं 'माचीस किंवा लाइटर पेटवू नका'

कोरोनाचे साईड इफेक्ट, नैराश्यातून आई आणि दोन मुलींची आत्महत्या

Updated: May 22, 2022, 08:36 PM IST
घरात गॅस चेंबर बनवून तिघांची आत्महत्या, दरवाजावर लिहिलं 'माचीस किंवा लाइटर पेटवू नका' title=

Coronavirus: एकाच कुटुंबातील तीन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात गॅस सुरु ठेवल्याने या तिघींचाही गुदमरुन मृत्यू झाला. मृतांमध्ये कुटुंबातील आई आणि 2 मुलींचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंब बराच काळ डिप्रेशनमध्ये होतं असं सांगितलं जात आहे. दिल्लातल्या वसंत विहारमधील ही धक्कादायक घटना आहे. 

आई आणि दोन मुलींचा आत्महत्या
आई मंजू श्रीवास्तव (55) मोठी मुलगी अंकिता (30) धाकटी मुलगी अंशुता (26) अशी मृतांची नावं आहेत. शनिवारी रात्री त्यांनी घरातला गॅस सुरु ठेवला. त्यामुळे घरात मोठ्याप्रमाणावर प्राणघातक वायू जमा झाला. यात गुदमरुन तिघींचाही मृत्यू झाला.  2021 मध्ये कुटुंब प्रमुख उमेश श्रीवास्तव यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर हे कुटुंब तणावात होतं. त्यातच आई मंजू श्रीवास्तवही आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होती. 

पोलिसांनी मिळाली माहिती
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 8:22 वाजता वसंत विहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांना फोन आला.  वसंत अपार्टमेंट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 207 मधील खोली आतून बंद आहे. घरातील लोक दार उघडत नाहीत. आवाज देऊन किंवा दारावरची बेल वाजवूनही आतून कोणी दरवाजा उघडत नाही. यानंतर एसएचओ वसंत विहार त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅटचा दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात तीन मृतदेह आढळून आले, खोलीचा दरवाजा आतून बंद होता, खिडकीही बंद होती.

घरात बनवलं होतं गॅस चेंबर
पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरात गॅस सुरु असल्याचं आढळलं. घरातील खोलीची झडती घेतली असता पोलिसांना सुसाईड नोटही सापडली. घराच्या आतील खोलीत बेडवर आई मंजू आणि तिच्या दोन मुली अंशिका आणि अंकू यांचे मृतदेह पडले होते. तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं.

दरवाजाजवळ चिकटवलेली सुसाईड नोट
पोलिसांना दरवाजावर चिकटवलेली सुसाईड नोट सापडली. त्यावर लिहिलं होतं, 'Too much deadly gas' दरवाजा उघडल्यानंतर माचिस किंवा लाइटर पेटवू नका, पोलीस किंवा कोणीही आत गेल्यावर कोणताही अपघात होऊ नये म्हणून ही चिठ्ठी लिहिली होती. दोन्ही मुलींनी घर आतून पूर्णपणे बंद केलं होतं. फॉइल आणि पॉलिथिनने खिडक्या आणि वेंटिलेशन झाकलेले होते. त्यानंतर त्यांनी गॅस सुरु केला. 

संपूर्ण कुटुंब डिप्रेशनमध्ये होतं
12 वर्षांपासून कुटुंबात काम करणाऱ्या कमला नावाच्या मोलकरणीने याबाबात महत्त्वाची माहिती दिली. संपूर्ण कुटुंब हसतं खेळतं होतं. पण जेव्हापासून त्यांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला, तेव्हापासून दोन्ही मुलीही नैराश्यात होत्या. वडिल उमेशच्या मृत्यूनंतर मुलींनी कमला यांनाही कामावरून काढून टाकलं होतं.

मुली घराबाहेर जात नव्हत्या
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गेल्या 28 वर्षांपासून इथं राहत होते. वडील उमेश सीए होते तर आई मंजू श्रीवास्तव गेल्या 12 वर्षांपासून आजारपणामुळे अंथरुणावर पडून होत्या. वडील उमेश आपल्या मुलींना जास्त बाहेर जाऊ देत नसत. शेजाऱ्यांनी मुली काय शिकतात, कुठे नोकरी करतात असं विचारल्यावर त्या ऑनलाईन अभ्यास करतात असं उत्तर देत होते. 

शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलगी अंशुता हिनेच आत्महत्येचा कट रचला असावा. कारण गेल्या चार पाच वर्षांपासून मोठी मुलगीही आजारी होती. घरात कोणतीही वस्तू मागवायची असेल तर लहान मुलगीच फोनवरुन मागवत असे अशी माहिती शेजारच्यांनी दिली. 

कोरोनामुळे मानसिक आरोग्य बिघडलं
भारतासह जगभरात कोरोनामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. गेल्या दोन वर्षांत मानसिक समस्या असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसून आली आहेत. यामुळेच लोकं आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत.