मुंबई : 1 मे रोजी रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीची पहिली खेप भारताला प्राप्त होणार आहे. देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे, त्या अंतर्गत 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. स्पुतनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होत आहे. याची माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख (आरडीआयएफ) किरील दमित्रीव ( Kirill Dmitriev) यांनी दिली. या पहिल्या केपमध्ये किती लसी असतील याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.
पहिली खेप 1 मे रोजी दिली जाईल असं दमित्रीव म्हणाले. यामुळे भारताला साथीच्या आजारावर विजय मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या जाळ्यात अडकला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होत आहे. इथल्या रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनसह सर्व वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांकडून भारताला मदत दिली जात आहे.
#India will receive first batch of Russia's #SputnikV vaccine on May 1 - Reuters quotes RDIF CEO Kirill Dmitriev
https://t.co/QCyistz8iZ— Sputnik V (@sputnikvaccine) April 27, 2021
मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ लागला आहे. ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणाचत वाढली आहे. लोकांना बेड मिळणं कठीण झालं आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने याला रोखण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे आहे.