चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसनं आता जगभरात थैमान घातलं असून अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या १०० वर पोहचली आहे. तर चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचा कहर वाढला असून तिथं २४ तासांत ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २५०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत.
इराणमध्येही कोरोनाच्या मृतांची संख्या हजाराच्या जवळ पोहचली आहे. स्पेनमध्येही मृतांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून या देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा ५०० च्या जवळ पोहचला आहे. स्पेनमध्ये एका रात्रीत तब्बल १८२ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेमध्ये शंभरावर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं सरकारनं आणखी खबरदारी घेतली आहे. वॉशिंग्टनमध्ये ५० हून अधिक जण मृत्युमुखी पडले असून न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक वेगानं होतोय. अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. काही जण वयाची साठी पार केलेले तर काही जण नव्वदीतील आहेत.
न्यूयॉर्कमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून तिथं कोरोनाबाधितांची संख्या ८०० वर पोहचली होती. सुमारे ८५ लाख लोकसंख्या असलेल्या न्यूयॉर्क शहरात नागरिकांना घरी राहण्याची वेळ येऊ शकते असं शहराच्या महापौरांनी सांगितलं आहे. रोज पाच हजार लोकांची टेस्ट केली जाऊ शकेल अशी तयारीही प्रशासनानं सुरू केली आहे.
अमेरिकेत ज्या शहरांमध्ये कोरोना पसरत आहे तिथल्या लोकांनी कामावर जाण्याऐवजी घरीच राहणं पसंत केलंय. शाळा, कॉलेज, मॉलही बंद आहेत. अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार असल्यानं ट्रम्प प्रशासनानं त्यावर मात करण्यासाठी पॅकेज जाहीर केलंय. ब्रिटन सरकारनंही कोरोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक स्थितीवर मात करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना अंमलात आणल्या जात असून १०० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय देशातील नागरिकांना देशाबाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा मात्र सुरु ठेवण्यात आल्या आहेत. जगभरात १ लाख ९५ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ७ हजार ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.