Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय... 

Updated: Mar 29, 2023, 07:25 PM IST
Corona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट title=

Corona Returs : सर्वांनाच सावध करणारी ही बातमी... मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) विळखा घट्ट होत चाललाय.. मंगळवारी एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या XBB 1.16 या नव्या व्हेरियंटची (Corona New Varient) लाट झपाट्यानं पसरतेय. गेल्या चोवीस तासात XBB.1.16 व्हेरिएंटची 610 प्रकरणं आढळली आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा आदेश दिला असून जीनोम सीक्वेंसिंगवर (Genome Sequencing) भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सावधान...कोरोना वाढतोय 
गेल्या चोवीस तासात देशभरात 2,151 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईत (Mumbai) 135, तर महाराष्ट्रात 450 कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 11,903 वर पोहोचलीय. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत.

महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 2,343 इतकी आहे. यात मुंबईतील 663 रुग्णांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या चोवीस तासात कोरोनाने देशभरात 4 बळी घेतले आहेत. यात महाराष्ट्रात 3 तर कर्नाटकात 1 रुग्ण दगावला आहे. 

भुजबळ-शंभूराज देसाईंना कोरोना
धक्कादायक बाब म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यापाठोपाठ उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Test positive) आलीय. दोघांवरही सध्या आयसोलेशन (Isolation) मध्ये घरच्या घरीच डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. हे दोघेही विधिमंडळ अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) उपस्थित होते. त्यामुळं त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदारांचं टेन्शन वाढलंय. छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना थंडी, ताप असल्याने कोरोना चाचणीही करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतर भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  तर कोरोना रिपोर्ट येण्याआधी देसाईंनी मरळी गावच्या श्री निनाईदेवीच्या यात्रेत सहकुटुंब हजेरी लावली होती. मिरवणुकीत गाण्याच्या तालावर ठेकादेखील धरला होता. त्यामुळं गावकऱ्यांची चिंता देखील वाढलीय..

खबरदारी बाळगा
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय.. सक्ती नसली तरी घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझरनं हात स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा... आणि कोरोना लसीकरण करून घ्या... अशा सूचना आरोग्य खात्यानं दिल्यात... या सूचनांचं पालन करा आणि कोरोनाला आळा घाला...