श्रद्धा वालकर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राशिदबाबत महत्त्वाची माहिती समोर; पोलिसांनी केली अटक

जर माझेही कोणासोबत भांडण झाले असते तर कापून टाकले असते, असे या माथेफिरुने म्हटले होते. भाजप नेत्या प्रिती गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे

Updated: Nov 25, 2022, 04:34 PM IST
श्रद्धा वालकर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राशिदबाबत महत्त्वाची माहिती समोर; पोलिसांनी केली अटक title=

Shraddha Walker case​ : श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. श्रद्धासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आफताब पूनावालाने (aftab poonawalla) तिची निर्घुणपणे हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे करत विविध ठिकाणी फेकले. हत्येच्या 9 महिन्यांनंतर हे प्रकरण समोर आले आहे. देशभरात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळलीय. राजकीय क्षेत्रातूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्यात. श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटलंय. मात्र एका माथेफिरुने या प्रकरणाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. ही प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आलीय.

श्रद्धा वालकर खून प्रकरणाबाबत एक प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती श्रद्धाच्या हत्येचे समर्थन करत होता. रागावलेला माणूस 35 काय 36 सुद्धा तुकडे करतो, असे म्हटले होते. व्हिडिओमध्ये त्याने स्वत:ला बुलंदशहरचे असल्याचे सांगितले होते. त्याला पत्रकाराने नाव विचारले असताना राशिद खान असे सांगितले होते.

'जर माझेही कोणासोबत भांडण झाले असते तर कापून टाकले असते. आफताबने सहज 35 तुकडे केले असतील,' असे स्वतःचे नाव राशिद सांगणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते. भाजप नेत्या प्रिती गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कॅप्शनमध्ये त्यांनी, 'बुलंदशहरमधील राशिद खानला भेटा. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे करणे अगदी सामान्य आहे असे त्याचे ठाम मत आहे. आपण कुठे जात आहोत?,' असे म्हटले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी व्हिडिओमधील व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्या व्यक्तीचे नाव राशिद नसून विकास कुमार असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

"दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला होता, जो दिल्लीत शूट करण्यात आला होता. यामध्ये एक व्यक्ती जो स्वतःला राशिद सांगत आहे त्याने काही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात सिकंदराबाद पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगण्यात आले होता. त्याआधारे या व्यक्तीला आज ताब्यात घेण्यात आले आहे," असे बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) श्लोक कुमार म्हणाले.

पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने त्याचे नाव विकास आहे. त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही विकासवर पाच गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.