नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयश हा आमच्यासाठी धडा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ता आणि नेत्यांमध्ये निराशा नाही. नवनिर्माण करण्याची आशा असल्याचे काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.
आम आदमी पक्षाचा विजय निश्चित आहे. काँग्रेसतर्फे आम्ही आम आदमी पार्टीला आणि अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देत असल्याचे सुरजेवाला म्हणाले.
आम्ही जनतेला १५ वर्षांच्या कामाबद्दल सांगितले. आमच्या कार्यकाळात दिल्लीमध्ये विकास झाला. ३ हजार कोटींच्या जाहीराती करुन ते जनतेसमोर गेले आणि जनतेने त्यांना स्वीकारले. पण दिल्लीची दुर्दशा झाली आहे. पण विद्यार्थ्यांवर विशेषत: तरुणांवर अत्याचार झाले. आमचे तरुण कॅम्पसच्या आत सुरक्षित नाहीत. मग केंद्र सरकार कुठे आहे ? गृहमंत्री कुठेयत ? मुख्यमंत्री कुठेयत ? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
निवडणुकीतील पराभवाने आम्हाला शिकवण दिली असून दिल्लीच्या विकासावर आम्ही लक्ष ठेवणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे.