Rahul Gandhi on Odisha Train Accident: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेवरुन पुन्हा एकदा मोदी सरकावर निशाणा साधला. तुम्ही मोदी सरकारला काही विचारलं तरी ते मागे वळून पाहतील अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्रेन दुर्घटना का झाली? असं त्यांना विचारलं तर ते म्हणतील काँग्रेसने 50 वर्षांपूर्वी हे केलं असा टोला त्यांनी लगावला. ओडिशा रेल्वे दुर्घटनेत 275 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी एका आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, मोदी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की त्यांना विचारा तुम्ही पुस्तकातून पीरियोडिक टेबल का हटवलं? ते लगेच म्हणतील काँग्रेसने 60 वर्षांपूर्वी हे केलं होतं.
LIVE: Address to the Indian Diaspora | New York, USA https://t.co/xolpviON3O
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2023
राहुल गांधी यांनी म्हटलं की, "त्यांना काही विचारलं की तात्काळ मागे पाहा असं उत्तर देतात. आता तुम्हालाच विचार करायचा आहे. तुम्ही सर्वजण येथे गाडीने आला आहात. आता विचार करा जर गाडी चालवताना तुम्ही फक्त मागील काचेत पाहिलं तर? तुम्ही कार चालवू शकाल का? एकामागोमाग अपघात होतील. प्रवासी तुम्हालाच काय करत आहात विचारतील".
राहुल गांधी पुढे म्हणाले की "ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची कार चालवायची आहे, पण ते फक्त मागे पाहत आहेत. कार पुढे का जात नाही? ती वारंवार धडक का देत आहे? हा विचार ते सारखा करत आहेत. हीच भाजपा आणि संघाची विचारसरणी आहे. तुम्ही मंत्री आणि पंतप्रधानांना ऐकलंत तर ते फक्त इतिहासाबद्दल बोलत असतात. कोणीही भविष्याबद्दल बोलत नाही. ते फक्त इतिहासातील लोकांना जबाबदार धरत आहेत".
"भारतात वेगवेगळ्या विचारसरणींची लढाई सुरु आहे. एक भाजपाची आणि दुसरी काँग्रेसचीय एका बाजूला नथुराम गोडसेची विचारधारा आहे आणि दुसरीकडे आम्ही महात्मा गांधींची विचारसरणी घेऊन पुढे जात आहोत. गांधीजींनी इंग्रजांविरोधात लढाई दिली होती, जी त्यावेळी अमेरिकेची मोठी ताकद होती. तुम्ही लोक गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरु यांच्या विचारसरणीवर वाटचाल करत आहात," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.