नवी दिल्ली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होतेय. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित असतील.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतली. सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकार बनवण्याबाबत सेना-भाजपला विचारा असं सांगत पवारांनी पुन्हा गुगली टाकलीय. शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढलीय. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला विचारा अशी प्रतिक्रिया पवारांनी दिलीय. पवारांनी दिल्लीत टाकलेल्या या गुगलीमुळे पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आलं.
दरम्यान, १० जनपथवरुन सोनियांना भेटून पवार आले... आणि लगेच ६ जनपथवरील पवारांच्या निवासस्थानी जात संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती राऊत यांनी भेटीनंतर दिली. पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रात लवकरच लोकप्रिय सरकार सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.